बीड (वृत्तसंस्था) पत्नीसह सख्खा पुतण्या, भाचा आणि अन्य एकाने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचे, तीन प्रियकरांच्या मदतीने दोन तुकडे करून, जिल्ह्याबाहेर नेऊन टाकणाऱ्या घटनेचा पोलिसांनी नऊ महिन्यांनी उलगडा केला आहे. दिगंबर गाडेकर असं हत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
बीडच्या (Beed) माजलगाव तालुक्यातील बाभळगाव येथील दिगंबर गाडेकर हे सप्टेंबर 2021 पासून घरातून गायब होते. संजय गांधी निराधार योजनेचे काम करणाऱ्या गाडेकर यांच्या बेपत्ता असल्याची नोंद दिंद्रुड पोलिसात झाली होती. दरम्यान 11 मे रोजी शेलगाव थडी शिवारात एका विहिरीत कंबरेखालचा भाग असलेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाच्या पॅन्टच्या खिशात काही महिलांचे फोटो आणि आधारकार्ड सापडले होते. पोलिसांनी त्यावरून तपास सुरू केला असता दिगंबर गाडेकर यांच्याकडे हे आधारकार्ड दिल्याचे या महिलांनी सांगितले. त्यावरून त्यांच्या घरी चौकशी केली असता नातेवाईकांनी ते बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यांची पत्नी देखील तेव्हापासून गायब असल्याचे सांगितले.
धक्कादायक बाब म्हणजे मयत दिगंबर यांचा पुतण्या गणेश गाडेकर, भाचा सोपान मोरे आणि बाबासाहेब घोगाने या तिघांचे मयताच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. आणि त्यामुळेच या तिघांनी मिळून दिगंबर यांना जालना जिल्ह्याच्या हद्दीवर नेऊन, त्यांची कुऱ्हाडीने क्रूरतेने हत्या केली आणि मृतदेहाचे दोन तुकडे करून दोन ठिकाणी टाकल्याचे समोर आले आहे. तर सख्खा पुतण्या आणि भाच्याने अनैतिक संबंधातून हा खून केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली असून आरोपी बायकोच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.