जळगाव ( प्रतिनिधी ) : ऑनलाईन पार्ट टाइम कामाच्या आणि ‘मर्चेंट टास्क’ पूर्ण करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी पाचोरा येथील एका उच्चशिक्षित महिलेला तब्बल ८ लाख ५० हजार ८०० रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा येथील रहिवासी किर्ती दिलीप येवले (वय ३२) या खासगी नोकरी करतात. दि. ८ ते दि. १२ जानेवारी दरम्यान, ‘अरोकीया जेनीता’ नावाच्या एका महिलेने, जी स्वतःला एनएसई ची प्रशासक विभागातील कार्यरत असल्याची सांगत होती, तीने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर टेलिग्रामवरील ‘ऐंजलिया’ नावाच्या अॅडव्हायजरने त्यांना ‘एनएसई मर्चेंट टास्क’ पूर्ण केल्यास मोठ्या फायद्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही टास्क पूर्ण केल्यानंतर किर्ती यांचा विश्वास संपादन करण्यात आला.
अधिक परताव्याचे अमिष पडले महागात
अधिक नफ्याच्या हव्यासापोटी सायबर फसवणुक करणाऱ्या टोळीने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरण्यास सांगितले. ८ ते १२ जानेवारी या अवघ्या चार दिवसांत तक्रारदार महिलेकडून एकूण ८ लाख ५० हजार रुपये ऑनलाईन भरून घेतले. मात्र, परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सायबर पोलिसात दिली तक्रार
आपली फसवणुक झाल्याची खात्री झाल्यानंतर दि. १० फेब्रुवारी रोजी किर्ती येवले यांच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
















