अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथे शेत रस्त्यावरून वाद झाल्याने शिवीगाळ करत दगड मारून महिलेचे डोके फोडल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात कळमसरे येथील शीतल प्रदीप महाजन (वय ३६) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार, ४ रोजी शीतल महाजन या सासू व जेठाणीसोबत शेतात गेल्या होत्या. शेतात पेरणीसाठी बोलवलेले ट्रॅक्टर येत असताना शीतल महाजन ही महिला रस्त्यात टाकलेले काटे उचलत होती. त्याचवेळी बाजूला शेत असलेले तुळशीराम त्र्यंबक महाजन व सरलाबाई तुळशीराम महाजन हे तेथे आलेत. तर, काटे का उचलत आहात? तसेच इकडून ट्रॅक्टर जाऊ देणार नाही, असे म्हणत त्यांनी शिवीगाळ सुरू केली. या वेळी शीतल महाजन यांनी शिवीगाळ करू नका, असे त्यांना सांगितले. त्याचा राग आल्याने तुळशीराम महाजन याने शीतल महाजन यांच्या कपाळावर दगड मारून डोके फोडले. तसेच येथेच गाडून टाकू, अशी धमकीही दिली. त्यावरून त्या दोघा पती-पत्नी विरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स. फौ. संजय पाटील करत आहेत.
















