जळगाव (प्रतिनिधी) जगणे सोपे असते परंतु, आपण ते कठीण करतो. पदरचे पैसे खर्च करून तंबाखूजन्य पदार्थ विकत घेऊन त्याचा उपयोग करून कर्करोगासारख्या दुर्धर आजारास आपणच निमंत्रण देत असतो. जगभरात तंबाखूजन्य पदार्थ सेवनाने वर्षाकाठी दीड कोटी लोकांचा आणि एकट्या भारतात १५ लाख जणांचा मृत्यू होतो. आपल्याला वाचविण्यासाठी आजच तंबाखू न खाण्याचा संकल्प करू या… असे अत्यंत कळकळीचे आवाहन जळगाव येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक नितीन विसपुते यांनी केले. जैन इरिगेशनच्या जैन प्लास्टिक पार्क आणि जैन फूडपार्क यासह सर्व आस्थापनांमध्ये ३१ मे हा जागतिक धुम्रपान निषेध व तंबाखूप विरोधी दिन म्हणून पाळला जातो त्यानिमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात कंपनीच्या सहकाऱ्यांशी ते सुसंवाद साधत होते.
जैन प्लास्टिक पार्क बांभोरी येथील डेमो हॉल येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी कामगार कल्याण अधिकारी किशोर बोरसे यांनी प्रास्तविक करून वक्ते नितीन विसपुते यांचे परिचय करून दिला. प्लास्टिक पार्क येथील सिक्युरिटी ऑफिसर श्री. मॅथ्यू यांनी गुटखा खाल्याचे दुष्परिणाम सोदाहरण स्पष्ट केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. यावेळी गार्डन विभागाचे जुने सहकारी दगडू सीताराम पाटील यांनी आपल्या व्यसनमुक्तीचे अनुभव कथन केले.
जगभर तंबाखूजन्य पदार्थ सेवन, धुम्रपान व व्यसनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. भारतामध्ये घराघरात तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर सेवन केले जातात. तंबाखू व्यसनाचे मुख्य कारण म्हणजे मोठ्यांचे लहानांनी केलेले अनुकरण होय. घरात आपले वडील,आई हे तंबाखू खातात, सिगारेट पितात त्यामुळे ते अपायकारक नाही असा समज घरातील मुलांचा होतो. घरातील आपले ज्येष्ठ हे पदार्थ सेवन करतात या अनुकरणाने हे व्यसन जडते याबाबत नमूद केले. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने. शुक्राणूंची संख्या कमी व क्षीण होत चालली आहे, भावी पिढी ही अशक्त जन्माला येत आहे. या समस्यांना सामोरी जावे लागत आहे. याच श्रुंखलेत जैन फूडपार्क येथील ओनियन ट्रेनिंग हॉल येथे सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान जैन अॅग्रिपार्क, जैन फूडपार्क आणि जैन एनर्जी पार्क येथील सहकाऱ्यांना देखील नितीन विसपुते यांनी मार्गदर्शन केले.
‘प्रेमाची आणि झोपेची कमी’ हेच व्यसनाधिनतेचे प्रमुख कारण आहे. स्वतःवर खूप प्रेम करा. तंबाखू सोडायचा मंत्र किंवा सिम्पल फंडा त्यांनी उपस्थितांना दिला; तो असा की, प्रत्येक एक तासाला एक ग्लास पाणी प्यावे, एक तास व्यायाम करावा आणि एक तास ध्यान करावे. या गोष्टी केल्यावर कुठलेही व्यसन सहज सुटते असा आत्मविश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि वक्ते नितीन विसपुते यांचा परिचय भूमिपुत्र संपादकीय विभागाचे सहकारी किशोर कुळकर्णी यांनी करून दिला. या कार्यक्रमासाठी समन्वयाचे काम जैन फूडपार्क येथील मानवसंसाधन विभागाचे भिकेश जोशी यांनी केले. या कार्यक्रमास एच आर विभागाचे वरिष्ठ अधिकारी जी.आर. पाटील एस.बी. ठाकरे, सुरक्षा विभागाचे प्रमुख आनंद बलोदी यांच्यासह जैन फूड पार्क येथील शंभरहून अधिक सहकारी उपस्थित होते.