नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. देशात गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांमध्ये घट होत असल्याचं पाहायला मिळत होतं. पण गेल्या २४ तासांत देशात तब्बल ३ लाख ४८ हजार ४२१ कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून ४ हजार २०५ रूग्णांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४८ हजार ४२१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर याच कालावधीत ३ लाख ५५ हजार ३३८ जणांनी कोरोनावर मात केली. चिंतेची बाब म्हणजे देशात एका दिवसात झालेल्या मृतांच्या संख्येनं नवा विक्रम नोंदवला आहे. देशात मंगळवारी ४,२०५ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २,३३,४०,९३८ वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा २,५४,१९७ वर पोहोचला आहे.
आतापर्यंत १७.५१ कोटी लोकांचे लसीकरण
आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, मंगळवारी २३.८ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. तर, आतापर्यंत देशातील १७.५१ कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. यात ९५ लाख ८१ हजार ८७२ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि ६५ लाख ३८ हजार ६५६ जणांना दुसरा डोस झाला आहे.