जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एमआयडीसी परिसरामधील श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर्स या कंपनीच्या गोडावून मधून सुमारे ८ लाख ३५ हजार रुपये किमतीचे राम बंधु पापड मसाल्याचे बंद पाकीट असलेल्या ७१ गोण्या चोरी केल्याची धक्कादायक समोर आली आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अतुल विश्वनाथ मुळे (वय-५९), रा. जीवन मोती सोसायटी मोहाडी रोड, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे एमआयडीसी मधील एम- सेक्टर मध्ये श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर्स नावाचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये त्यांनी राम बंधू पापड मसाला भरलेल्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या. २४ मार्च ते २६ मार्च च्या कालावधीमध्ये अज्ञात चोरट्यांनी या गोडाऊनचे शटर उचकवून आतून ८ लाख ३५ हजार रुपये किमतीचे रामबंधू पापड मसाल्याचे बंद पाकीट असलेले ७१ गोण्या चोरून नेल्या. ही घटना बुधवार २६ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आले आहे. याप्रकरणी गुरुवारी २७ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.