कल्याण (वृत्तसंस्था) अचानक रेल्वेत शिरलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी धावत्या ट्रेनमध्येच एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नराधमांनी रेल्वेतील १५ ते २० प्रवाशांना लुटल्यानंतर त्यांनी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केलाय. ही घटना लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये घडली असून याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली आहे.
रेल्वे पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, लखनऊ – मुंबई पुष्पक एक्स्प्रेस शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता इगतपुरी स्थानकावरून निघाली. त्यावेळी सात ते आठ लोक रेल्वे बोगीत चढले. काहींच्या हातात शस्त्र होते. त्यांनी प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुमारे २० प्रवाशांना लुटले आहे. त्याचवेळी विरोध करणाऱ्या प्रवाशांना दरोडेखोरांनी मारहाण केली. यात पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
लखनऊ-मुंबईला जाणारी पुष्पक एक्सप्रेस कसारा स्टेशनवर पोहोचेपर्यंत लूट आणि बलात्कार करण्यात आला. या घटना सुमारे अर्धा तास चालू होती. दरोडेखोरांनी प्रवाशांना धमकावल्यानंतर प्रवाशांनी कसारा स्टेशनवर गोंधळ घातला. यावेळी रेल्वे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली . त्यानंतर रात्री उशिरा आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी चार जणांचा शोध घेण्यात येत आहे.