चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड शिवारात रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली, ज्यामध्ये अलवाडी येथील युवक सुनील साहेबराव अहिरे (वय २७) रानडुकराच्या भीषण हल्ल्यात मृत्युमुखी पडला. याप्रकरणी वन विभागाने माहिती घेऊन पुढील कार्यवाही सुरु केली आहे.
बेलदारवाडी रस्त्यावर अलवाडी येथील सुनील आपल्याच मक्याच्या शेतात सकाळी ७ वाजता चारा काढण्यासाठी गेला होता, परंतु सकाळी ११ वाजेपर्यंत तो परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतल्यानंतर त्याला शेतात मृत अवस्थेत आढळले. वन विभागाचे अधिकारी शीतल नगराळे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत मृतदेह ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालयात आणला. सुनीलच्या शरीरावर शिंगांमुळे झालेल्या जखमा आढळल्या. तर रानडुकराच्या हल्ल्यात सुनील अहिरे ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदार करंबेळकर यांनी व्यक्त केला आहे. वैद्यकीय पथकाने सुनीलच्या मृत्यूचे कारण अतिरक्तस्राव असल्याचे स्पष्ट केले. वन विभागाने याप्रकरणी माहिती घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.