मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री देवेंद्र फणडवी जी, वाढदिवसानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन!”, असं ट्विट करत खडसेंनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांनाही खडसेंनी शुभेच्छा दिल्या आहेत. २०१४ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर एकनाथराव खडसे हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, दिल्लीतून पक्षश्रेष्ठींचा आदेश आला अन् देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचे पंख छाटण्यास सुरुवात केली होती. नंतरच्या काळात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथराव खडसे हे भाजपमध्ये अक्षरश: एकटे पडले होते. त्यांनी वारंवार विनंती करूनही त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले नव्हते. या सगळ्यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. परंतु, त्यांच्या आरोपांची फारशी दखल घेण्यात आली नव्हती. अखेर एकनाथ खडसे यांनी २०२० मध्ये भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून तर आतापर्यंत खडसे यांनी फडणवीसांवर टीका करायची एकही संधी सोडलेली नाहीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात नाथाभाऊंनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांची चांगलीच चर्चा रंगली आहे.