जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या व सार्वजनिक आरोग्य विभागाकडील दिनांक 23 ऑक्टोबर, 2020 च्या परिपत्रकानुसार यापूर्वी नमूद तरतुदी शिथिल करण्यात आला आहेत. या परिपत्रकाच्या अधिन राहून दिनांक 25 ऑक्टोबर, 2020 पासून जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित ( Containment Zone) क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले क्षेत्र वगळून व भविष्यात वेळोवेळी प्रतिबंधित ( Containment Zone) क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणारे क्षेत्र वगळून उर्वरीत क्षेत्रात व्यायामशाळा ( Gymnasiums) सुरु करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. असे आदेश अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अधक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी निर्गमित केले आहे.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली (SOPs) नुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश यापुढेही लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असेही श्री. राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.