जळगाव/चोपडा (प्रतिनिधी) काही वेळासाठी बाहेर जावून येतो, असं सांगून घराबाहेर पडलेल्या शिवाजी नगरमधील बेपत्ता तरुणाची मोटारसायकल विदगाव तापी नदीजवळ आढळून आल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची भीती व्यक्त केली जात होती. दुर्दैवाने ही भीती खरी ठरली असून त्या तरुणाचा मृतदेह चोपडा तालुक्यातील रोटवद जवळील दोंदवाडे गावाजवळील नदीपात्रात आढळून आला आहे. चंद्रकांत शांताराम मराठे (वय-३२, रा.शिवाजी नगर) असे मयत तरुणाचे नाव असून मृतदेह अवस्था खराब असल्यामुळे जागेवरच अंतिम संस्कार केले जाणार आहेत.
चंद्रकांत शांताराम मराठे (वय-३२, रा.शिवाजी नगर) हा तरुण २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता आपली दुचाकी क्रमांक (एमएच १९, डब्ल्यू ५८७०) घेवून घराबाहेर गेला होता. मात्र बराच वेळ झाल्याने मुलगा घरी आला नाही म्हणून त्याचे वडील शांताराम मराठे यांनी मोठा मुलगा प्रदिप व मुलगी कल्पना यांना याची माहिती दिली. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी शांताराम मराठे यांनी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली. परंतू विदगाव तापी पुलावर बेपत्ता झालेल्या चंद्रकांतची दुचाकी १ ऑक्टोबर रोजी आढळून आली. दुचाकी नदी जवळ लावलेली असल्यामुळे चंद्रकांतने उडी घेवून आत्महत्या केली असावी, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे चंद्रकांत मराठे याने दोन लोकांविरुद्ध तक्रार दिली होती. खोटे गुन्हे दाखल करण्याची चंद्रकांतला धमकी दिली जात होती. जिल्हापेठ पोलिसात चंद्रकांतने दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले होते की, भारत एंटरप्राइजेस ब्रांच येथे मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हे कार्यालय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये असून याच कॉम्प्लेक्समध्ये विनोद एजन्सी हे दुकान आहे. मागील काही दिवसापासून विनोद एजन्सीचा मालक भोईटे व मुख्यत व टोपी धारण करणारा त्याचा (कर्मचारी नाव माहीत नाही) माझी खोटी बदनामी करून कॉम्प्लेक्स मधील लोकांना भडकवित आहे. सतत माझ्या ऑफिससमोर गुंड आणून सतत धमकावणे व महिलेच्या छेडखानीच्या खोट्या आरोपाखाली अडकवून जमावाकडून मारहाण करणे, असे षड्यंत्र रचत आहे. मार्च महिन्यात त्यांच्या कर्मचाऱ्याने माझ्या मोटरसायकलची छेडखानी करून सतत तीन ते चार दिवस हा मानसिक त्रास दिला. त्यावेळी मी या टोपीवाला कर्मचाऱ्यास हटकले होते. तेव्हापासून त्याने मला धमकी आणि त्रास देण्यास सुरुवात केली. काही महिन्यापूर्वी नेरी येथे ब्रांच सुरू झाली, मी तेथे मार्केटिंगसाठी जात होतो. तेथेसुद्धा माणसांना सुपारी देऊन त्रास देण्यास सुरुवात केली. माझी रेकीसुद्धा हे लेख लोक करीत असावे, तरी या घटनेची दखल घेऊन एनसी दाखल करावी. कारण माझ्या जीवाला या लोकांपासून धोका निर्माण झाला आहे, असे तक्रारीत म्हटले होते.
दरम्यान, मयत चंद्रकांत मराठे यांचे मेहुणे नितीन पवार यांनी ‘द क्लिअर न्यूज’सोबत बोलतांना सांगितले की, चार दिवस झाल्यामुळे मृतदेहाची अवस्था खराब असल्यामुळे जागेवरच करणार आहोत. चंद्रकांतला ज्यांनी त्रास दिला आहे, अशी सर्वांची नावं त्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहेत. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.