धरणगाव (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी वाळू माफियांनी वाळूचे साठे करून ठेवले आहेत. तक्रार करूनही यावर कारवाई होत नसल्यामुळे थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे कॉंग्रेसचे शहर सरचिटणीस रामचंद्र माळी सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, रात्रंदिवस धरणगाव शहरातून अवैध वाळू वाहतूक सुरु असल्याचेही श्री. माळी यांनी म्हटले आहे.
या संदर्भात अधिक असे, शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी वाळू माफियांनी वाळूचे साठे करून ठेवले आहेत. अगदी वाळूचे पहाडच शहराच्या भोवताली दिसत असतात. यावर तक्रार करूनही यावर कारवाई होत नसल्यामुळे संतप्त कॉंग्रेसचे शहर सरचिटणीस रामचंद्र माळी थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे महसूलमंत्री कॉंग्रेसचेच असल्यामुळे रामचंद्र माळी यांची आक्रमक भूमिकेकडे गंभीरतेने बघितले जात आहे. प्रांतधिकारी व तहसीलदार यांच्याकडे कब्रस्तानसह इतर ठिकाणच्या वाळू साठ्याबाबत तक्रार केली. तहसीलदार यांनी कारवाईचे आश्वासन दिले. परंतू कोणतीही कारवाई केली नाही. याबाबत त्यांना विचारले तर पंचनामा झाल्याचे सांगितले. परंतू पंचनाम्याची प्रत दाखविण्यास नकार दिला. आता याबाबत आपण महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही रामचंद्र माळी म्हणाले. दरम्यान, रात्रंदिवस धरणगाव शहरातून अवैध वाळू वाहतूकीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

















