जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्याचा पैसा ‘वॉटर ग्रेस’मध्ये गुंतवल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यासंदर्भात चौकशीसाठी तपास अधिकारी भाग्यश्री नवटके यांची लवकरच भेट घेऊन तक्रारी अर्ज करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अॅड.विजय पाटील यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलताना दिली आहे.
अॅड.विजय पाटील यांनी पुढे सांगितले की, ‘बीएचआर’ घोटाळ्याचा पैसा नाशिक येथील ‘वॉटर ग्रेस’चा ठेका, मांजरपाडा आणि समृद्धी योजनेतील वाहन पुरवठ्याचा ठेक्यात गुंतवल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. तर सुनील झंवर हे नगरसेवक किंवा पालिकेची ठेकादार नाहीत. त्यांचा महापालिकेशी थेट कोणताही संबंध नाही. परंतू तरी देखील शहर स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या वॉटर ग्रेस कंपनीची कागदपत्र झंवर यांच्या कार्यालयात सापडतात कशी?, हा मोठा प्रश्न आहे. यावरून झंवर यांचा ‘वॉटर ग्रेस’ कंपनीसोबत थेट संबंध असल्याचे अधोरेखीत होते. एवढेच नव्हे झंवर यांच्या कार्यालयात सापडलेल्या एका डायरीत नगरसेवकांना देण्यात आलेल्या पैशांचा लेखाजोखा आहे. एवढेच नव्हे तर, त्यात सांकेतिक अर्थात शॉर्टकट पद्धतीने नाव लिहिलेली आहेत. दरम्यान, यामुळे झंवर, ‘वॉटर ग्रेस’ आणि महापालिका कनेक्शन उघड होत. याच अनुषंगाने ‘बीएचआर’ घोटाळ्याचा पैसा वॉटर ग्रेसमध्ये गुंतवण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही तपास अधिकारी भाग्यश्री नवटके यांची लवकरच भेट घेऊन तक्रारी अर्ज करणार असल्याचे अॅड. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, ‘वॉटर ग्रेस’च्या कारभाराबद्दल सर्वत्र बोंबाबोब असल्यानंतर या कंपनीचा ठेका रद्द होत नाही. या कंपनीसोबत झंवर यांचे नाव आता समोर येत असून झंवर यांचे ‘गॉड फादर’ हे सर्व जगाला माहित आहे, असेही अॅड. पाटील म्हणाले. दुसरीकडे महापालिकेतील ‘वॉटर ग्रेस’चा ठेका आणि त्यातून झालेल्या आर्थिक व्यवहारांची तपासणीसाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक महापालिकेत धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर ‘वॉटर ग्रेस’मध्ये ‘बीएचआर’ घोटाळ्याच्या पैशातून झाली आहे का?, याची तपासणी आर्थिक गुन्हे शाखा करणार असल्याचे कळते.