ठाणे (वृत्तसंस्था) पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासात दुसरा खोटा गुन्हा दाखल केला आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे.
‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटात इतिहासाची तोडमोड केल्याचा दावा करत कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्यात या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत अटकेची कारवाईही करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना नुकताच जामीन मिळाला असतानाच आता आणखी एका प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या आव्हाड यांनी थेट विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याविरुद्ध पोलिसी अत्याचार सुरु असल्याचा दावा करत आव्हाड यांनी ही घोषणा केली आहे.
आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचा आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनीधक्का दिल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलिसात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यानी मला न्याय द्यावा, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने करण्यात आली आहे.
या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलाय. आपल्यावर दाखल केलेलला गुन्हा खोटा असल्याचं त्यांनी म्हटलंय. जितेंद्र आव्हाड यांना नुकताच जामीन मिळाला होता. विवियामा मॉलमधील मारहाणप्रकरणी वर्तक नगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक केली होती. त्यानंतर शनिवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर केला होता. हर हर महादेवस सिनेमाचा शो जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडला होता. या सिनेमात दाखवण्यात आलेल्या इतिहासावर त्यांनी आक्षेप नोंदवला होता.