जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेला पतीसह सासरच्या मंडळींकडून मारहाण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसानंतर गर्भवती महिला प्रसूती झाली. यासंदर्भात आज एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की सोनाली सागर गायकवाड (वय २२ वर्ष रा. मंगलपुरी, रामेश्वर कॉलनी) पीडित विवाहितेणे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की २५ ऑगस्ट २०२० रोजी माझे पती सागर व मुलगी गुंजन असे तिघेजण सासूच्या श्राद्धाचा कार्यक्रम असल्याने माझी ननंद सुनिता संतोष भावसार (रा. रेणुका नगर) यांच्याकडे गेलो होतो. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास माझी ननंद सुनिता भावसार ही घरगुती कामावरून माझ्याशी भांडण करू लागली. याबाबत मी माझ्या पतीकडे सुनिताच्या बाबतीत तक्रार करत सांगितली की, मी गर्भवती असल्याने माझ्याकडून जास्त काम होत नाही. यावर माझ्या पतीने रागात मला लाकडी दांड्याने हातावर, पाठीवर, कमरेवर जोरदार मारहाण करून दुखापत केली. त्यावेळी सुनीता हिने देखील मला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तर माझे ननंदेचे पती संतोष वामन भावसार यांनीसुद्धा शिवीगाळ करून मला घराच्या बाहेर हाकलून लावले. एवढेच नव्हे तर पुन्हा घरात आली तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देखील दिली. मी गर्भवती असल्याने मला पोटात दुखू लागले होते. त्यामुळे मी २५ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गोदावरी हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल झाली त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी माझी प्रसूती होत मला मुलगी झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पती सागर गायकवाड, सुनिता संतोष भावसार, संतोष वामन भावसार यांच्याविरुद्ध भादवि ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महेंद्रसिंग पाटील हे करीत आहे.