जळगाव (प्रतिनिधी) मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपनगरी लोकलसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी लोकल प्रवास करून सविनय कायदेभंग केलेले आंदोलन राज्य गाजले होते. आता शहरातील शिवाजीनगर रेल्वे जिना सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी पुन्हा खुला करावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना संविनय कायदेभंग आंदोलन करून जनतेला त्याचा अधिकार मिळवून देईल, असा इशारा मनसेचे अॅड. जमील देशपांडे यांनी एका निवेदनाद्वारे जळगाव रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
शिवाजीनगर रेल्वेपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी रेल्वे जिन्याचा वापर करावा लागत आहे. परंतू मागील काही दिवसांपूर्वी जिना बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की . शिवाजी नगरमधील नागरीक हे भारत देशाचे नागरीक आहेत, पाकीस्तानचे नाहीत. रेल्वेची मालमत्ता ही देशाची मालमत्ता म्हणजेच जनतेची मालमत्ता आहे. उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने शिवाजीनगर परीसरातील हजारो नागरीकांना शहरात येतांना मोठा वळसा घालून वावे लागते. ज्यांच्याकडे वाहने आहेत ते लांबचा प्रवास करून शहरात येतात. मात्र ज्यांच्याकडे वाहनच नाही व जे नागरीक पायी प्रवास करतात. त्यांना रेल्वे जीन्याशिवाय पर्याय नाही. प्रसंगी रूळ ओलांडून ते शहरात येतात. त्यामुळे अपघात होण्याची मोठी शक्यता आहे.
अशा नागरीकांना जिना वापरण्यास का म्हणून बंदी घालण्यात आली हे कोड आहे. देशात लोकशाही आहे, रेल्वे विभागाची हुकूमशाही नाही. शिवाजीनगर परीसरातील जनता देशाचे नागरीक आहेत. रेल्वे विभाग आपल्याच देशातील नागरीकांना दुय्यम नागरीकांसारखी वागणुक का देत आहे. लोकशाहीच्या राज्यात हुकुमशाहीचा फतवा काढण्याचा अधिकार रेल्वे विभागाला कोणी दिला? रेल्वे उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. रेल्वे पुलाचे बांधकाम साहीत्य ने-आण करण्याकरीता महानगरपालीका क्षेत्रातील रस्त्याचा वापर रेल्वेविभाग करते. रेल्वेचे अधिकारी सुद्धा सामान्यतः नगरपालीका क्षेत्रातील रस्ता वापरतात. मग त्यांनी या रस्त्यावरील वापर बंद करावा व रेल्वे रूळाद्वारे ये-जा करावी व साहीत्यही रेल्वे रूळामार्गे आणावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाला या निवेदनाद्वारे ईशारा देण्यात येत आहे की, ७ दिवसाच्या आंत रेल्वे जिना वापरण्याकरीता सुरू करावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सविनय कायदेभंग आंदोलन करून जनतेला त्याचा अधिकार मिळवुन देईल. शेकडोच्या संख्येने रहीवाशांना रेल्वे जिन्यावर आणून आंदोलन करेल, असा इशारा देखील निवेदनात देण्यात आल आहे. या प्रसंगी जिल्हा सचिव अॅड.जमील देशपांडे, तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, संदीप मांडोळे, रज्जाक सय्यद, मतीन पटेल, योगेश पाटील, चेतन पाटील, आशिष सपकाळे, पंकज चौधरी, संदीप महाले, कन्हैय्या राजपूत, संघपाल कीर्तिकर उपस्थित होते.