जळगाव (प्रतिनिधी) शहर पोलीस ठाण्याच्या मागील बाजूला असलेल्या डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी व्यापारी संकुलातील दोन पान टपरी फोडल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.
शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी व्यापारी संकुल आहे. व्यापारी संकुलात रविंद्र सुकलाल वाणी यांचे दु.क्र.२९ विजय पान मंदिर दुकान आहे तर जवळच मुतारी बाहेर रमेश सपकाळे यांची जय बजरंग नावाने पान टपरी आहे. मंगळवारी रात्री ७ वाजता दोघे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले.
रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत दोन्ही दुकानांचे कुलूप तोडून संधी साधली. चोरट्यांनी रविंद्र वाणी यांच्या दुकानातून ७०० रुपयांची सिगारेटचे पाकीट, २०० रुपयांची चिल्लर आणि टेबल फॅन असा २५०० चा ऐवज लंपास केला. रमेश सपकाळे यांच्या दुकानातून चॉकलेटची बरणी आणि चिल्लर असा ऐवज लंपास केला.
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असून त्याठिकाणी भुरटे चोर नेहमी धूम करीत असतात. रात्रीच्या वेळी अंधार आणि सामसूम असल्याची चोरटे संधी साधतात. यापूर्वी देखील अनेक वेळा याठिकाणी चोऱ्या झाल्या असून व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे आजवर एकही चोर समोर आलेला नाही. दरम्यान, शहर पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.