मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे एकनाथराव खडसे यांना कृषिमंत्रीपद मिळण्याची चर्चा होती. अगदी आपण कृषीमंत्रीपद सोडण्यास तयार आहोत. पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी म्हटले. परंतू खातं का सोडायचे? असा प्रश्न शिवसेनेत निर्माण झाला आहे. त्यामुळे खडसेंचे पुनर्वसन नेमकं कसे होते? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
शिवसेनेने कृषी खातं सोडले नाही तर गृहनिर्माण खाते एकनाथ खडसेंना दिले जाईल असेही सांगितले जात होते. परंतु जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खाते सोडण्यास अनुकूल नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे तुर्तास एकनाथराव खडसेंना ताकदीचे पद मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल,असे चित्र निर्माण झाले आहे. विरोधी पक्ष भाजपाला रोखण्यासाठी खडसेंचा वापर राष्ट्रवादीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे खुद्द शरद पवार शिवसेनेला खातेबदल करण्यास तयार करतात का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वाधिकार आहेत. ते जो निर्णय घेतील, जो आदेश देतील त्याचे पालन करणे हे शिवसैनिकाचे काम आहे आणि दादा भूसे एक शिवसैनिक आहे, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
















