जळगाव (प्रतिनिधी) हो निर्णय घ्यायचा आहे. दुसरीकडे काय पद मिळते, ते तर बघू दे. दुसरीकडे जाऊन का नुसतेच बसायचे, काही तरी पद मिळाले पाहिजे की नाही, असा कार्यकर्त्याबरोबर संवाद असलेली भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधान आले आहे.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रोशन भंगाळे या एका कार्यकर्त्याने एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधून पक्ष सोडण्याची विनंती केली. दरम्यान, या चर्चेची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये वरणगाव येथील एक कार्यकर्ता ‘भाऊ राष्ट्रीय कार्यकारणीतही डावलण्यात आले आहे. भाऊ, आपला काहीतरी निर्णय घ्या, आतापण त्यांनी तुम्हाला काही नाही दिले, पंकजा मुंडेंना दिलं…आता पक्ष सोडा व योग्य निर्णय घ्या, अशी विनंती करतो. त्यावर खडसे अरे जाणार आहे, पण शेवटी पद-बिद काहीतरी ठरलं पाहिजे की नाही. दुसरीकडे काय पद मिळते, ते तर बघू दे. दुसरीकडे जाऊन का नुसतेच बसायचे, काही तरी पद मिळाले पाहिजे की नाही, असे सांगत महिनाभरात निर्णय घेणार असल्याचे कार्यकर्त्याला सांगतात. दरम्यान, माझ्यासारखा आवाज काढणारे महाराष्ट्रात भरपूर आहेत. हा आवाज माझा नाही, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी याविषयी बोलण्यास नकार दिला.
















