नाशिक (वृत्तसंस्था) नाशिकरोड परिसरातील एका हॉटेलमध्ये पतीने पत्नीला भेटायला बोलावून तिचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर फरार होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगाव (जि. अहमदनगर) येथील ज्योती पोपट वीर व पती पोपट वीर यांच्यात वाद सुरू होता. याच कारणावरुन ज्योती या जेलरोड भागातील त्यांच्या माहेरी आल्या होत्या. पती पोपट याने पत्नी ज्योतीला मंगळवारी (२८ सप्टेंबर) सायंकाळी बिटको पाॅंईट येथील पवन हाॅटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. हॉटेलमध्ये पत्नी आल्यानंतर दोघांमध्येही वाद झाला. त्यानंतर पतीने पत्नीच्याच ओढणीचा तिचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर पोपट वीर हा तेथून पळ काढत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक गणेश न्याहळे, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले.