नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सीबीआय विशेष न्यायालय ३० सप्टेंबरला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी निर्णय देणार आहे. न्यायालयाने लालकृष्ण आडवाणी, एमएम जोशी, कल्याण सिंह आणि उमा भारती यांच्यासह सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिले आहेत.
बाबरी विध्वंस प्रकरणातील कोर्टाचा निर्णय २८ वर्षानंतर येत आहे. सीबीआयने या प्रकरणात ३५१ साक्षीदार आणि ६०० दस्तावेज पुराव्याच्या स्वरुपात न्यायालयात सादर करण्यात आले आहे. ६ डिसेंबर १९९२ ला वादग्रस्त मशीद विध्वंस प्रकरणात माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजप नेता विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी रितम्बरा यांच्यासह एकूण ३२ आरोपी आहेत. यापूर्वी सुनावणी दरम्यान सर्व आरोपींना ऑनलाईन हजर केले होते. दरम्यान, सीबीआयचे वकील ललित सिंह यांनी सांगितले, की फिर्यादी आणि बचाव पक्ष दोन्ही पक्षांची सुनावणी १ सप्टेंबरला पूर्ण झाली असून त्यानंतर विशेष न्यायमूर्तींनी निकाल लिहणे सुरु केले आहे.