जळगाव (प्रतिनिधी) बिहारमधील काही भामट्यांनी ३ महिन्यात पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून जळगावातील एका व्यावसायिकाला साडेतीन लाखात गंडविले आहे. ही घटना गेल्या अाठवड्यात मुजफ्फरपूरला घडली आहे. मनोज शोभाराम भाटी (वय ३७, रा. कुसुंबा) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, कुसुंबा येथील मनोज शोभाराम भाटी याने दीड वर्षांपूर्वी बिहार राज्यातील एका तरुणीसोबत लग्न झालेले होते; मात्र लग्नानंतर संबंधित तरुणी पळून गेली होती. लग्नात मनोजची ओळख बिहारमध्ये उत्क्रमित विद्यालयात शिक्षक असलेल्या भीमराज सिंह नावाच्या व्यक्तीसोबत झाली होती. लग्नानंतर भीमराज सिंह हा मनोजच्या संपर्कात होता. महिन्यांपूर्वी मनोजला विश्वासात घेत पटना येथे गोरगरिबांसाठी काम करणाऱ्या सेवा सदन नावाच्या सेवाभावी संस्थेमार्फत एका प्रकल्पात पैसे गुंतवले की ३ महिन्यात गुंतवणूकदाराला गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दामदुप्पट मोबदला परत मिळतो, अशी थाप मारली. यावर विश्वास ठेऊन मनोज आमिषाला बळी पडला. मनोज याेजनेत सहभागी हाेण्यास तयार झाल्यानंतर भीमराज सिंहने त्याला साडेतीन लाख रुपये घेऊन मुजफ्फरपूरला बोलावले हाेते. त्यानुसार गेल्या आठवड्यात मनोज त्याच्या आईला सोबत एक लाख रुपयांची रोकड घेऊन बिहारमध्ये गेला हाेता. ते दोघे मुजफ्फरपूरला पोहचल्यानंतर भीमराज सिंह व त्याच्या साथीदारांनी त्यांना एका हॉटेलात मुक्कामी थांबवले. या दरम्यान दोन दिवसात मनोजने त्याच्या आईच्या बँक खात्यातून एटीएममधून अडीच लाख रुपये काढले. साडेतीन लाख रुपये जमल्यानंतर मनोजने पेपर कप मशीनबाबत भीमराजला विचारणा केली. मशीन घेण्यासाठी पटना जावे लागेल, म्हणून तो मनोजला एका कारने घेऊन निघाला. वाटेत एका निर्जनस्थळी कार थांबवून मनोजकडून गाडीतील चौघांनी पैशांची बॅग हिसकावली.