जळगाव प्रतिनिधी । येथील ज्येष्ठ साहित्यीक व जिल्हा दूध संघाचे माजी व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश मोरे यांनी कोरोनाच्या पाच महिन्याच्या लॉकडाऊन कालावधीत लिहीलेल्या ‘महाराणी येसूबाई संभाजीराजे भोसले’यांच्या जीवनावर प्रदीर्घ ऐतिहासिक कादंबरीचे प्रकाशन नुकतेच झाले.
राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची स्नुषा, छत्रपती संभाजीराजे यांच्या धर्मपत्नी महाराणी येसूबाई यांच्या बाल्यावस्थेपासून तर त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंतचा जवळपास ७१ वर्षाचा जीवनपट कादंबरीत शब्दशब्द केला आहे. हिंदवी स्वराज्य वर्धिष्णू व्हावे, अबाधित राहावे आणि सुरक्षित रहावे म्हणून त्यांनी २९ वर्षे, आठ महिने १९ दिवस इतका प्रचंड राजबंदीवास उत्तरेत भोगला.
औरंगजेबाचा सेनापती जुल्फिकार खान याने रायगड किल्ल्यांवरुन महाराणी येसूबाईंना राजबंदी केले. स्वराज्याची देखभाल राजबंदीवासात असतांनाही त्यांनी केली आणि जिंजीची गादी शाबूत व कर्नाटकातली जिंजीची गादी छत्रपती राजाराम महाराजांद्वारे शाबूत ठेवली. पुस्तकांचे मुखपृष्ठ शिवचित्रकार मिलिंद विचारे यांनी रेखाटले आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये त्यांच्या रेल्वे हमाल (कुली) यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ‘बिल्ला’ या कादंबरीचेही लिखाण पूर्ण झाले आहे.
यासंदर्भात लेखक ज्ञानेश मोरे यांनी सांगितले की, इतिहासाने येसूबाईंची पाहिजे तेवढी दखल घेतली नाही. त्यांच्या जीवनकार्याची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी कांदबरीचे शिवधनुष्य पेलेले आहे.