नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका औषध निर्मिती कंपनीमधून लीक झालेल्या विषाणूमुळे होणाऱ्या ब्रुसेलोसिसचा संसर्ग झालेले हजारो रुग्ण सापडल्याने चीनमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ग्लोबल टाइम्समध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार, २४ जुलै २०१९ ते २० ऑगस्टदरम्यान झॉनगुम लॅन्झू येथील जैविक औषधनिर्मिती करणाऱ्या कारखान्यामध्ये लस निर्मिती करण्याचे काम केले जात होते. लॅन्झू येथील प्राणी संशोधन केंद्राजवळ असणाऱ्या या कारखान्यामध्ये प्राण्यांना होणाऱ्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रुसेला विषाणुंच्या मदतीने औषधांची निर्मीत करण्यात येत होती. याच औषध निर्मितीदरम्यान कारखान्यातील धूर आणि गॅस प्रक्रिया न करता तो बाहेर सोडण्यात आला. त्यामधूनच लोकांना आता आजाराची बाधा झाली आहे. डोकं दुखणे, दिवसाआड ताप येणे, घसा खवखवणे ही या आजाराची लक्षणं आहेत. वेळीच उपचार न मिळाल्याने ब्रसेलोसिसमुळे मृत्यूही होऊ शकतो.