नाशिक प्रतिनिधी । शिक्षक दिनाचे औचित्य साधून नवनीत फाउंडेशन तर्फे ‘नवदिशा’या शिक्षकांसाठी असलेल्या पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. ज्ञानतपस्वी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंती निमित्ताने हे पोर्टल शिक्षकांना समर्पित करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण जगतातील प्रमुख घडामोडींविषयी, नव्या बदलांविषयी शिक्षकांना जागरूक करणे, शिक्षकांशी संवाद साधून त्यांचे व्यावसायिक समृद्धीकरण करणे इत्यादी उद्देशांसह ही विनामूल्य पोर्टल सेवा नवनीत फाउंडेशनने उपलब्ध केली आहे.गेली ६३ वर्षे नवनीत ही शैक्षणिक साहित्य व प्रकाशनांमधील अग्रगण्य संस्था आहे. व्यावसायिक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्थापन झालेल्या नवनीत फाउंडेशनने शिक्षण, आरोग्य, आपत्ती निवारण इत्यादी क्षेत्रांत भरीव योगदान दिले आहे.
सन२०१६ पासून फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या. या चार वर्षांत आयोजित झालेल्या एकूण ३२२ कार्यशाळांमधून १५००० पेक्षा अधिक शिक्षकांना या उपक्रमाचा लाभ झाला. वर्ष २०२० मध्ये कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रत्यक्ष कार्यशाळा घेणे शक्य नसल्याने वेबिनार्सच्या माध्यमातून शिक्षकांशी संवाद सुरू झाला. ही सर्व वेबिनार्स पोर्टलवर उपलब्ध आहेत. याशिवाय ज्येष्ठ, तज्ज्ञ शिक्षकांचे विषयनिहाय लेख, मुलाखती, नावीन्यपूर्ण व अनोखे उपक्रम, विद्यार्थी व शिक्षकांचे शंका-समाधान, प्रश्नोत्तरे, शासनाने प्रसिद्ध केलेली पत्रके, शासननिर्णय असा भरगच्च मजकूर ‘नवदिशा’ पोर्टलवर शिक्षकांना वाचायला मिळेल. वेळोवेळी हा मजकूर अद्ययावत केला जाईल. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शिक्षकांनी या पोर्टलचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवनीतचे संचालक अनिल गाला यांनी केले आहे.