जळगाव (प्रतिनिधी) डोटा व्हेरिफिकेशनच्या कामातून नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत व्यावसायिक दीपक गोपीचंद नाथाणी (वय ५०, रा. गणेश नगर) यांना १८ लाख ९१ हजारात गंडविले. ही घटना ऑक्टोबर २०२२ ते एप्रिल २०२३ या दरम्यान घडला. या प्रकरणी दि. २४ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात त्रिदेव वढेरा उर्फ आकाश अरोरा, निशू गुप्ता, कुणाल शर्मा व मनीष कुमार (रा. नोएडा, उत्तरप्रदेश) या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील व्यावसायिक असलेले दीपक नाथाणी यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्याने ते वर्क फ्रॉम होम पद्धतीचे काम ऑनलाईन शोधत होते. त्या वेळी त्यांना सोशल मीडियावर एका कंपनीची जाहिरात दिसली. त्यासाठी त्यांनी त्यावर दिलेल्या दोन मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता समोरील दोन व्यक्तींनी त्यांच्या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे काम करीत असून ते कंपनीच्या फ्रेंन्चायसी चालविण्याकरिता देत असल्याचे त्यांना सांगितले. त्यानुसार नाथानी हे पत्नी व एक मित्र असे तिघेजण नोएडा येथे संबंधित कंपनीत गेले व कंपनीचा मालक कुणाल शर्मा याला भेटले. तेथे दुसऱ्या कंपनीचा मालक त्रिदेव वढेरा व त्याची पत्नी निशू गुप्ता हे देखील त्याठिकाणी भेटले. तिघांनी कंपनीच्या कामाचे स्वरुप सांगितले व नफ्याबद्दलची संपुर्ण माहिती नाथाणी यांना दिली.
संबंधितांनी नाथानी यांना कंपनीच्या कामाची माहिती दिल्यानंतर नवीन सेटअपसाठी मनीष कुमार नामक व्यक्तीचा बँक खाते क्रमांक दिला. त्यावर १ लाख २१ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यावर नाथाणी यांनी विश्वास ठेवला. तसेच पत्नी व स्वतःच्या नावावर फ्रेन्चाईसी घेण्यासाठी करार करण्याचे ठरवून वेळोवेळी पत्नी व स्वतःच्या बँक खात्यावरून एकूण १८ लाख ९१ हजार ५२ रुपये दिलेल्या बँक खात्यावर पाठविले. फ्रेंन्चाईसीची रक्कम भरल्यानंतर नाथाणी हे संबंधित कंपनीकडे डेटाची मागणी करीत होते. मात्र त्यांना कोणताही डेटा दिला गेला नाही. या विषयी त्यांनी मोबाईलवर संपर्क साधून विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीचे उत्तरे मिळू लागले. नंतर ते नोएडा येथे जाऊन कंपनीच्या कार्यालयात भेटले. तुम्ही जा व लगेच काम सुरू करा, असे सांगून त्यांना परत पाठविले. मात्र तरी देखील डेटा काही मिळत नव्हता. नंतर तर संबंधित मोबाईल क्रमांकही बंद येऊ लागल्याने नाथानी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
दरम्यान, दीपक नाथाणी यांनी कंपनीविषयी विचारणा केली असता ही कंपनी देशभरात अनेकांना अशाच प्रकारे गंडविल्याचे त्यांना समजले. नाथाणी यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार त्रिदेव वढेरा, निशू गुप्ता, कुणाल शर्मा व मनीष कुमार (रा. नोएडा, उत्तरप्रदेश) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि मीरा देशमुख करीत आहेत.