मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण होत आहे. पाकिस्तातून समुद्रामार्गे आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईत अक्षरशः रक्तपात घडवला. हा हल्ला इतका भयंकर होता की, अवघ्या जगाचा थरकाप उडाला होता. भारतातील हा काही पहिला दहशतवादी हल्ला नव्हता. यापूर्वीही देशाला हादरवणारे हल्ले झाले.
२६/११ चा दहशतवादी हल्ला इतका भीषण होता की, भारतच नाही तर संपूर्ण जग हादरलं होतं. पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी सीएसएमटी रेल्वेस्थानकासह मुंबईच्या रस्त्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. लोकांना ओलीस ठेवलं. नरीमन हाऊस, हॉटेल ताज, हॉटेल ऑबेरॉयमध्ये प्रचंड विध्वंस घडवून आणला होता. या हल्ल्यात जिवंत पकडण्यात आलेल्या कसाबला नंतर फासावर देण्यात आलं. २५ जून २०१६ मध्ये काश्मीर खोऱ्यातील पंपोरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २० जवान शहीद झाले होते. त्याचबरोबर उरीमध्येही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर भारतानं सीमेपलीकडील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं होतं. साल २००६. ११ जुलैचा दिवस होता. मुंबईत नेहमीप्रमाणे घड्याळाचा काट्यावर धावत होती. पण, काही क्षणात सर्वकाही ठप्प झालं. वेगवेगळ्या लोकल रेल्वेगाड्यांमध्ये ७ बॉम्बस्फोट झाले. इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवला होता. या हल्ल्याच्या आठवणी अजूनही मुंबईकर विसरलेले नाहीत. यात २१० लोक मरण पावले होते, तर ७१५ जण जखमी झाले होते. २६ डिसेंबर २००६. दहशतवाद्यांनी यावेळी रक्तपात घडवण्यासाठी ठिकाण निवडलं ते मालेगाव. मालेगावमध्ये झालेल्या तीन बॉम्बस्फोटात जवळपास ३२ लोक मरण पावले होते. तर १०० पेक्षा अधिक जखमी झाले होते. रमजानची नमाज अदा करण्यासाठी जात असतानाच हा हल्ला करण्यात आला होता.
१९ वर्षांपूर्वी देशात एक भयंकर दहशतवादी हल्ला होता. साल होतं २००१. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. विरोधकांनी गोंधळ घातल्यानं सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्याचवेळी लश्कर ए तोयबा व जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला. या हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. यात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं.