मुंबई (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील खंडवा येथील मोबाईल अॅक्सेसरीजचा दुकान मालक प्रवीण राठोड हा तरुण कोट्यधीश असल्याचं समोर आलंय. प्राप्तिकर विभागाने प्रवीण राठोड याला 300 कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी नोटीस बजावली आहे. प्रवीण गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे.
गेल्या वर्षात प्रवीणच्या बँक खात्यात 290 कोटी 39 लाख 36 हजार 817 रुपयांचा मोठा व्यवहार झाला. प्राप्तिकर विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी प्रवीणला नोटीस बजावली. मुंबईतील एका बँकेत हे खाते असून त्यात हा मोठा व्यवहार झाला आहे. मात्र, प्रवीणच्या म्हणण्यानुसार त्याचे असे कुठलेही खाते नाही. आता या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास करण्यास ना स्थानिक पोलिस तयार आहेत ना आयकर विभाग. आपल्याला मदत मिळत नसल्याने हा तरुण नाराज आहे.
प्रवीण राठोड याला प्राप्तिकर विभागाची नोटीस
खंडवा-इंदूर मार्गावरील खंडवाजवळील देशगाव गावातील प्रवीण राठोड याला प्राप्तिकर विभागाने नोटीस दिली असून, सुनावणीसाठी 15 मार्च रोजी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या कारणे दाखवा नोटीसमध्ये त्यांनी 12 मार्च 2021 रोजी त्यांच्या अॅक्सिस बँक मुंबई खात्यातील 290 कोटी 39 लाख 36 हजार 817 रुपयांच्या व्यवहाराची माहिती मागवली आहे.
आयकर नोटीसमुळे माझा मानसिक छळ
याआधीही प्रवीण राठोडला अशाच आणखी दोन नोटिसा आल्या होत्या, मात्र त्याने त्या गांभीर्याने घेतल्या नाहीत. तिसरी नोटीस आल्यावर मात्र तो अस्वस्थ झाला. प्रवीण राठोड म्हणाला, ‘आयकर नोटीसमुळे माझा मानसिक छळ होत आहे. मी येथील पोलिस ठाण्यात गेलो असता त्यांनी सांगितले की बँक येथे नाही, त्यामुळे येथे एफआयआर होऊ शकत नाही. खांडव्याला गेल्यावर त्यांनी सांगितले की, मुंबईत फसवणूक झाली आहे, मग तिथे जाऊन तक्रार करा. याची सखोल चौकशी झाली पाहिजे, दोषींपर्यंत पोहोचले पाहिजे.’