नागपूर प्रतिनिधी । रेल्वेचे लोखंड चोरी करणाऱ्या चार आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातील ३४ हजार ५०० रुपयांचे लोखंड जप्त करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे सुरक्षा दलाचा जवान भूपेंद्र बाथरी १९ सप्टेंबरला दुपारी १.२५ वाजता ड्युटीवर होता. त्याने नवीन कुमार या जवानाला रेल्वेचे लोखंड चोरी झाल्याबाबत सूचना दिली. त्यानुसार नवलसिंह दाबेराव, अनिल उसेंडी, राजेश गडपलवार यांनी आरोपी शिवा हल्कीप्रसाद समसेरीया (३६) रा. हंसराज कोचे नमो बुद्धविहाराजवळ, इंदोरा, रिपब्लिकननगर, मुख्तार खुर्शीद अंसारी (६५) रा. ५७, बुद्धविहाराजवळ, योगी अरविंदनगर, शिवाजी चौक यांना ई रिक्षा क्रमांक एम. एच. ४९, ए. आर-२४१२ मध्ये रेल्वेचे ७० किलो लोखंड नेताना पकडले. त्यांनी आरोपीला मोक्षधाम येथील लोखंड विकलेल्या दुकानावर नेले असता तेथे रेल्वेचे चोरी केलेले लोखंड आढळले. त्यानंतर रेल्वेचे लोखंड खरेदी करणाऱ्या प्रशांत वासुदेव ढाकणे (५०) यास अटक करण्यात आली. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवी जेम्स, उपनिरीक्षक होतीलाल मीना आणि जवानांनी पार पाडली.