धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील दिव्यांग बांधवाना शासनाच्या नियमानुसार ५ टक्के निधी तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन व दिव्यांग महासंघ तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी केली.
धरणगाव नगरपालिका येथे दिव्यांग बांधवांची नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्याशी या संदर्भात चर्चा करण्यात आली. नगरपालिकेच्या उत्पन्नातून ५ टक्के निधी हा दिव्यांग बांधवाना देण्यात येतो. परंतु आतापर्यंत फक्त एक हजार रुपये दिव्यांगांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. माहितीच्या अधिकारामध्ये कार्यकर्त्यांनी माहिती मागितली असताना २०११ मध्ये ३ लाख २०१७ ते २०१९ मध्ये ६ लाख रुपये अखर्चित अशी माहिती मिळाली होती. परंतू सदरचा निधी हा इतरत्र खर्च केल्यामुळे व वसुली पूर्ण न झाल्यामुळे दिव्यांगांना निधी मिळू शकला नाही. मी नगराध्यक्ष असताना एक हजार रुपये निधी दिला होता. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून दिव्यांगांना लवकरात लवकर निधी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी दिले. यावेळी दिव्यांगांना नगरपालिकेच्या घरपट्टी व नळपट्टी ५० टक्के माफ करण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली.