छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) आई-वडिलांच्या डोळ्यादेखत पोटच्या मुलाचा ट्रॅक्टर ट्रॉलीखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगावात घडली. दिपक नवनाथ मोरे (१४, रा. भोकनगाव ता. कन्नड) असे मयत मुलाचे नाव आहे.
जामगाव येथील एका साखर कारखान्याच्या ऊसतोडीसाठी कन्नड तालुक्यातील घोकमठाण व परिसरातील काही ऊसतोड कामगार रविवारी परिवारासह साहित्य घेऊन डबल ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरमध्ये बसून जात होते. या दरम्यान सिद्धनाथ वडगाव येथील एका शाळेसमोर आले असता पहिल्या ट्रॉलीमध्ये बसलेला दीपकचा तोल जाऊन ट्रॉलीतून खाली पडला. काही कळण्याच्या आतच ट्रॅक्टरला जोडलेल्या दुसऱ्या ट्रॉलीचे चाक दीपकच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर दीपकची झालेली अवस्था पाहून काहींना तर चक्कर आले होते.
घटनेची महिती मिळताच शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेळके यांनी पोलिस उपनिरीक्षक नजीर शेख, श्रीकृष्ण दाणी, संतोष धाटबळे, हनुमंत सातपुते यांना तातडीने घटनास्थळी पाठवून ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. पुढील तपास पि.एस.आय. नजीर शेख करीत आहे. दरम्यान, डोळ्यादेखत आपल्या पोटच्या मुलाचा ट्रॅक्टर ट्रॉलीखाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने आई-वडिलांनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता. यावेळी अनेकांना देखील आपले अश्रू रोखता आले नाहीत. याबाबतचे वृत्त आज स्थानिक माध्यमांनी दिले आहे. मृत दीपकच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.