चाळीसगाव (प्रतिनिधी ) वाघळी ते कजगावदरम्यान २ राेजी नांदेडकडून-अमृतसरकडे जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेसमधून एका प्रवाशाला, कंत्राटी रेल्वे सफाई कामगाराने ढकलून दिल्याची खळबळजनक घडली होती. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
(१२७१५) सचखंड एक्सप्रेसच्या एसी कोच बी/३ मधून एक प्रवासी प्रवास करत होता. एक्सप्रेसने चाळीसगाव सोडल्यावर हा प्रवासी बाथरूमसाठी जात होता. वाटेत त्या कोच मधील एका सफाई कामगाराने त्या प्रवाशाला चालत्या गाडीतून ढकलून दिले. ही घटना पाहणाऱ्या प्रवाशाने याची माहिती औरंगाबाद रेल्वे पोलिसांना दिली. ज्या सफाई कामगाराने प्रवाशाला ढकलले त्याचा फोटोही त्या प्रवाशाने पोलिसांना पाठवला. त्यानुसार औरंगाबाद रेल्वे पोलिसांनी ही माहिती चाळीसगाव रेल्वे पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक किसन राख यांना कळवली. तेव्हा सचखंड एक्सप्रेस पाचोऱ्याच्या पुढे निघून गेली होती. सहाय्यक निरीक्षक राख यांनी भुसावळ रेल्वे पोलिसांना संशयित कामगाराचा फोटो पाठवून माहिती कळवली. चाळीसगाव रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रात्रभर चाळीसगाव ते वाघळी, कजगाव, नगरदेवळा स्थानकादरम्यान रेल्वे लाइनवर शोधमोहीम राबवली. तसेच पीएसआय शब्बीर शेख, हवालदार संदीप जावळे, राजेश पाटील, जितेंद्र वाघ गाडीतून ढकललेल्या अनोळखी प्रवाशाचा शोध घेतला. मात्र प्रवासी आढळून आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कजगावजवळ रेल्वेमार्गाच्या बाजूला झुडपात ५५ ते ६० वर्षे वयाच्या प्रवाशाचा मृतदेह अाढळला. दरम्यान, अद्याप मृताची ओळख पटलेली नाही.