भंडारा (वृत्तसंस्था) शेतात पिक पेरणी करत असतांना विहिरीत एक कासव दिसल्यानंतर त्याला पकडण्याच्या मोहात विहिरीत उतरलेल्या दोन तरुण शेत मजूरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखनी तालुक्यातील पेंढरी गावालगतच्या मोगरा – शिवनी शेतशिवारात बुधवारी घडली. दयाराम सोनिराम भोंडे (३५) आणि मंगेश जयगोपाल गोंधळे (२६, दोन्ही रा. मेंढा / भूगाव, ता. लाखनी) अशी मृतकांची नावे आहेत. मृतकापैकी मंगेशचे एक महिन्यापूर्वीच लग्न जुळले होते आणि दिवाळीत लग्न उरकणार होता.
पिक पेरणी करण्यासाठी मेंढा येथील मजूर गढपेंढरी येथील शेतकरी विष्णुदास गायधने यांच्या शेतात आले होते. घटनेच्या दिवशी सकाळी आलेले मजूर वेगवेगळ्या धुऱ्याने शेतातील धुऱ्यात उतरत होते. त्यापैकी मृतक हे बांधीत उतरत असलेल्या धुऱ्यालगत असलेल्या एका विहिरीजवळून पेरणी करत असतांना त्यांना विहिरीत एक कासव दिसले. कासवाच्या मोहात दोघं जण एकामागून एक दोघं विहिरीत उतरले. आधी उतरलेला बेशद्ध झाल्याने दुसराही तरुण विहिरीत उतरला. या दोघांनाही पुन्हा वर येताच आले नाही. हे कळताच तिसरा मजूर किशोर हजारे याने सहकाऱ्यांना मदतीसाठी आरडओरडा केला. विहिरीत अडकलेल्यांना वाचविण्यासाठी सुधीर हजारे हा विहिरीच्या ५ ते ६ पायऱ्या खाली उतरला. परंतु, त्यांचा श्वास गुदमरल्याने इतर मजुरांनी साडीच्या साहाय्याने त्याला वर खेचले. त्यामुळे तो सुखरूप बाहेर आला.
घटनेची माहिती लाखनी पोलीस ठाण्यात देण्यात आली. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय परीक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय, लाखनी येथे पाठविले. याप्रकरणी लाखनी पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दयाराम भोंडे व मंगेश गोंधळे यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक मंगेशचे काही महिन्यांपूर्वी लग्न जुळले होते. येणाऱ्या दिवाळीत त्याचा विवाह होणार होता. दरम्यान, काही ग्रामस्थांच्या मते, हे मजूर पाणी काढण्यासाठी आत उतरले होते, तर काहींच्या मते कासव पकडण्यासाठी उतरले होते. तर काहींच्या मते पेरणी करत असतांना तोल जाऊन पडल्याने दोघांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलीस तपासात नेमकं कारण समोर येणार आहे.