वर्धा (वृत्तसंस्था) जुन्या वादातून वृद्ध महिलेच्या मानेवर तलवारीने वार करीत तिचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली. रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास इतवारा बाजार परिसरातील पोलीस चौकीपासून काही दुरीच्या अंतरावर घडलेल्या या घटनेने परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृतक महिलेचे नाव मरियन मेहबूब शाह (वय ६० रा. इतवारा बाजार) असे आहे.
मृतक मरियन शाह व तिच्या घराचे परिसरात राहणारा सचिन किसन कांबळे (३२) यांच्यात जुना वाद होता. २२ जुलै रोजी सचिन याच्यासोबत धीरज गौतम व सूरज गौतम या दोन भावांनी वाद केला. दोघांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात सचिन गंभीररित्या जखमी झाला होता. त्या घटनेची तक्रार शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबाबतचा गुन्हा नोंदवून गौतम बंधूंना अटक केली. त्याचवेळी जखमी सचिन याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या घटनेपासून सचिन हा नेहमी शाह दाम्पत्यावर संशय घेऊन त्यांना जिवानिशी मारण्याची धमकी देत होता. शनिवारी सकाळी सचिन याने मरियम व तिचा पती यांच्यासोबत वाद घातला. काहींच्या मध्यस्थीनंतर तो वाद शांत झाला. रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पुन्हा त्याच्यात वाद उफळला. सचिन हा तलवार घेऊन मृत महिलेचा पती मेहबूब रुस्तम शाह (५६) यांच्यावर तलवारीने प्रहार केला. तो वार हुकल्याने मेहबूब बचावले. यावेळी मेहबूद घाबरून तेथून पळून गेला तेव्हा त्याची पत्नी मृत मरियम ही मध्यस्थीसाठी गेली आणि माझ्या पतीला का मारतो?, अशी विचारणा केली. त्यावर क्रूरकर्मा सचिनने मरियमच्या डोक्याचे केस ओडून तिला रस्त्यावर खाली पाहून जवळील धारदार तलवारीने मरियमच्या गळ्यावर सपासप तीन ते चार घाव घातले. यामुळे मरियम रक्ताच्या थारोळ्यात निपचित खाली पडली. हे पाहून आरोपी सचिनने तेथून पळ काढला. याबाबतची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. परिवारातील सदस्य व इतरांच्या मदतीने मरियन हिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, प्रभारी ठाणेदार चंद्रशेखर चकाटे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. मेहबूब रुस्तम शाह यांच्या तक्रारीवरून सचिन कांबळे याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार कैलास पुंडकर हे करीत आहे. आरोपी सचिन कांबळे यांच्या शोधार्थ पोलिसांचे वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत.