बुलढाणा (वृत्तसंस्था) जिल्ह्यातून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या मामानेच २३ वर्षीय अविवाहित भाचीवर सतत ४५ दिवस लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याबाबत जळगाव-जामोद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधम मामला अटक केली आहे.
तालुक्यातील एका गावातील पीडित तरुणी तिच्या काकाच्या घरी जात असताना आरोपीने आवाज देत तिला बोलावले. त्यावेळी मोबाइलमधील एका मुलाचा फोटो दाखवून त्याच्यासोबत लग्न लावून देतो, अशी मुलीला बतावणी केली. त्यानंतर पीडित युवतीला २८ मार्च रोजी आरोपीने पीडितेला पूर्णा फाटा येथे नेले. तेथून बसने मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरमधील खरगोन तालुक्यातील खिकरीज-वळील खरमपुरा गावात घेऊन गेला. तेथे आरोपी मामाने पीडितेला ४५ दिवस घरात डांबून ठेवत वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. २४ मार्च ते १३ मेपर्यंत आरोपी मामाने अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ नराधम मामला अटक केली आहे. याबाबतचे वृत्त एका दैनिकाने आज प्रसिद्ध केले आहे.















