चाळीसगाव (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे नेते व जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांनी भाजपा शिवसेना युतीच्या पहिल्याच राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निकटवर्तीय व उत्तर महाराष्ट्रातील वजनदार नेते असलेले गिरीषभाऊ महाजन यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने जळगाव जिल्ह्यात जल्लोष साजरा केला जात असून चाळीसगाव येथे देखील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी गिरीषभाऊ तुम आगे बढोच्या घोषणांनी परीसर दणाणून काढला. आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयाबाहेर एकत्र येत फटाके फोडण्यात आले व एकमेकांना पेढे भरवून हा आंनद साजरा केला गेला. सदर प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, आजी माजी लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ना.गिरीषभाऊ महाजन यांचे अभिनंदन केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या मंत्री पदाच्या कार्यकाळात राज्याच्या जलसिंचन व आरोग्य क्षेत्रात भरीव काम करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते, वरखेडे धरणाचे शिल्पकार, भाजपाचे संकटमोचक, नाशिक व जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.ना.श्री.गिरिषभाऊ महाजन यांनी आज नवीन मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. हा केवळ जळगाव जिल्ह्यासाठीच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात सातत्याने उत्तर महाराष्ट्र, खान्देश यांना निधीपासून वंचित ठेवण्यात आले. मात्र आता ना.गिरीषभाऊ यांच्यासारखा अनुभवी व वजनदार मंत्री नवीन सरकार मध्ये आल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल हा विश्वास आम्हाला आहे अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.