जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ झालेल्या दरोड्यातील मास्टरमाईंड अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी व त्याचा साथीदार दर्शन भगवान सोनवणे या दोघांना एलसीबीच्या पथकाने शहरातून अटक केली. त्याच्यांकडून ४८ लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून त्यांना दि. २२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धरणगाव तालुक्याती पिंप्री येथील दुर्गेश इंप्रेस जिनींगची १ कोटी ६० लाखांची रोकड घेवून जातांना दरोडेखोरांनी त्यांचे वाहनाला धडक दिली. त्यानंतर चालकाच्या डोळ्यात मिरची पुड टाकून त्यांजवळील रोकड घेवून दरोडेखोर पसार झाले होते. यातील मुख्य संशयित अनिल उर्फ बंडा कोळी याने हा दरोडा टाकल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी चार पथके तयार करुन संशयितांच्या मागावर रवाना केले होते. या पथकाने शहरातून अनिल उर्फ बंडा कोळी व त्याचा साथीदार दर्शन सोनवणे या दोघांच्या मुसक्या आवळल्या, त्यांना धरणगाव न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. २२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
४ वाहनांसह हत्यार हस्तगत
मुख्य सूत्रधार अनिल उर्फ बंडा कोळी याच्याविरुद्ध दरोडा, मारामारी या सारखे सहा गंभीर गुन्हे असून त्याचा साथीदार दर्शन सोनवणे हा देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून दरोड्यात वापरलेल्या चार वाहने व तलवार, चॉपर, गुप्ती असे हत्यार जप्त करण्यात आले आहे.
या पथकाची कामगिरी
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, कर्मचारी विजयसिंग पाटील, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, महेश महाजन, अकरम शेख, राहूल पाटील, भगवान पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, रफिक शेख, लक्ष्मण पाटील, सुधाकर अंभोरे, जयंत चौधरी, संदिप सावळे, किरण चौधरी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, अनिल जाधव, हेमंत पाटील, राहुल बैसाणे, दर्शन ढाकणे, महेश सोमवंशी, अभिलाषा मनोरे, रजनी माळी, वैशाली सोनवणे, रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेंढे, कमलाकर बागुल, संदिप पाटील, गोरख बागुल, प्रविण मांडोळे, अनिल देशमुख यांच्या पथकाने केले.
एलसीबीने केला पर्दाफाश
मिरची पुड टाकून जिनींगमधील दीड कोटींची रक्कम लुटल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी त्यांनी एलसीबीच्या पथकाला दरोड्याचा उलगडा होईपर्यंत घरी येवू नका, अशा सुचना दिल्या होत्या. एलसीबीच्या पथकाने पोलीस अधीक्षकांनी दिलेले आव्हान पेलत अवघ्या २४ तासात या गुन्ह्यातील मास्टरमाइंडच्या मुसक्या आवळून या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. तसेच इतर दरोडेखोरांच्या मागावर पथक असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
कारागृहात शिजला व्यापाऱ्याला लुटण्याचा कट
मुख्य संशयित अनिल उर्फ बंडा कोळी याने दीड वर्षापूर्वी शहरातील एका प्रसिद्ध उद्योजकाच्या घरावर दरोडा टाकला होता. याच गुन्ह्यात तो जिल्हा कारागृहात असतांना त्याची ओळख घरफोडीमधील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारासोबत झाली, त्याला भेटण्यासाठी उल्हासनगर येथून त्याचे नातेवाईक कारागृहात भेटायला येत होते. दरम्यान, अनिल उर्फ बंड यांच्यासोबत देखील त्यांची जवळीक वाढली, बंडा हा जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने उल्हास नगर येथील दरोडा टाकणाऱ्या टोळीशी संपर्क साधून प्लॅन तयार करीत भरदिवसा दरोडा टाकला.
गोठ्यात लपवून ठेवलेली रोकड हस्तगत !
भरदिवसा व्यापाऱ्याला लुटल्यानंतर दरोडेखोरांनी लुटलेल्या पैशांचे सहा हिस्से करुन ते आपापसात वाटून घेतले. त्यानंतर उल्हास नगर येथील दरोडा टाकणारी टोळी तेथून पसार झाली, तर अनिल उर्फ बंडा व त्याचा साथीदार दुर्गेश सोनवणे हे त्यांच्या गावी निघून गेले. लुटलेल्यानंतर मिळालेली सुमारे ४८ लाखांची रोकड अनिल उर्फ बंडा याने दुर्गेश सोनवणे यांनी डांभुर्णी येथील त्यांच्या नातेवाईकांकडे ठेवलेली होती. त्यांच्या घराजवळील गोठ्यातू पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ४८ लाखांची रोकड हस्तगत केली आहे.