पारोळा (प्रतिनिधी) अमळनेर शहरालगत असलेल्या बोदवड रस्त्यावर एका विहिरीच्या पाण्यात पारोळ्यातील १७ वर्षीय युवकांचा बुडून मृत्यू झाला. या तरूणाचा मृतदेह एसडीआरएफच्या पथकाने ४ तासांच्या अथक प्रयत्नांनी शोधून काढला.
पारोळा येथील वंजारी शिवारालगत राहणाऱ्या विनोद धोत्रे यांचा मुलगा शुभम विनोद धोत्रे (वय १७) हा शिक्षणासाठी अमळनेर येथे राहतो. शुभम हा प्रताप महाविद्यालय बारावीचे शिक्षण घेत होता. १६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ४ ते ५ मित्रांसह तो विहिरीत पोहायला गेला. त्याने विहिरीत उडी मारली, परंतु, तो वर आलाच नाही. यानंतर इतर मुलांनी आरडाओरड केल्यानंतर तत्काळ घटनास्थळी स्थानिक नागरिक पोहोचले. त्यांती तात्काळ मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना ही माहिती दिली.
दरम्यान, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी रेल्वे प्रवासात सायंकाळी ६.०३० वाजता जिल्हाधिकारी व एसडीआरफचे राज्य संचालक यांना मदत व बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले होते.
१६ ऑगस्ट रोजी अथक परिश्रमानंतर रात्री १०.३० वाजता शुभमचा मृतदेह सापडला. एमडीआरएफने स्थानिक आदिवासींच्या तरूणांच्या मदतीने रात्री उशिरा मृतदेह शोधून काढला. त्यात पारोळा तालुक्यातील वडगाव येथील हिलाल श्रावण भील या दिव्यांग व्यक्तीने विहिरीतील शोध कार्यात मोलाची भूमिका निभावली. शुभम धोत्रे यांच्या पश्चात आई, वडिल, आजी आणि बहिण असा परिवार आहे.
















