जळगाव (प्रतिनिधी) “मनातील अव्यक्त भावनांना वाट करून देण्यासाठी केलेले शब्दबद्ध लेखन म्हणजे नवकाव्यलेखन” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शिवव्याख्याते तथा पाठ्यक्रमिक कवी प्रेमचंद अहिरराव यांनी केले.
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव संलग्न शाखा पाचोरा व एरंडोल तसेच महात्मा फुले साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी, बालकवी त्र्यंबक बापू ठोंबरे, साहित्यिक प्र. के. अत्रे यांची जयंती व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शुक्रवार दि. १३ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कविसंमेलनात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना अहिरराव बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी ज्येष्ठ बालसाहित्यिका तथा महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जळगाव कार्यकारी सदस्या सौ .मायाताई धुप्पड, सुप्रसिद्ध साहित्यिका श्रीमती सीमा भारंबे, ह .भ. प .मनोहर खोंडे उपस्थित होते.
सौ. अपर्णा वाघ (लेक), श्रीमती मनीषा मालपुरे (गोड आठवणी), पुष्पलता पाटील (देरानी जेठानी) यांनी कविता सादर केल्या. सौ. मायाताई धुप्पड यांनी स्वलिखित कविता सादर न करता बालकवींचे ‘रागोबा आला आला आमुच्या ताईला’ हे अंगाईगीत व ‘या बाई या, बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या’ हे शिशुगीत गात बालकवींना सुस्वरांकीत भावांजली वाहून कार्यक्रम उंचीवर नेला. श्रीमती सीमाताई भारंबे यांनी ‘खान्देश’ कवितेतून खान्देशाच्या वैभवशाली कला, संस्कृती, परंपरांचे गौरवगान समर्थपणे केले. श्रावण महिन्याच्या अनुषांगिक कविता सौ. मनिषा पाटील यांच्या ‘हिरवळ दाटे चोहीकडे’, अशोक पारधे यांच्या ‘वन मुकूंद’ व संजय निकम यांच्या ‘पाण्यात नभ’ कवितांमधून निसर्गोल्हास तर श्रीमती सुनिता पाटील यांनी ‘का रुसला देव ?’ कवितेतून निसर्गाच्या प्रकोपामुळे माणूसकीच्या हतबलतेची व्यथा मांडून माणुसकीला आवाहन करीत विचार प्रवृत्त केले.
पंकज भावसार : ‘ गाण्याचं गाणं ‘, अश्विनी पाटील : ‘ शब्द ‘ सुनिता साबळे : ‘ लग्नाच्या गाठी’ यांच्या कवितांनी मनावर गारुड केलं. श्रद्धा पवार यांनी शेतकऱ्याच्या मुला कवितेतून आईवडीलांच्या कष्टाची महती सांगत कर्तव्याचीही जाण करून दिली. विजय लुल्हे यांनी ‘डार्विनचं सांत्वन’ कवितेतून पुरुषांच्या विकृत मनोवृत्तीवर ताशेरे ओढले. सुप्रसिद्ध चित्रकार सुनिल दाभाडे यांनी ‘यमाची चौकशी’ कविता सादर केली. श्रावणात चराचर सृष्टीला होणारा अत्यानंद व निसर्गातील मनोहारी बदल ‘आला श्रावण’ या कवितेच्या सुश्राव्य गायनाने छाया पवार पाटील यांनी काव्य वाचनाचा समारोप केला. तसेच प्रारंभी प्रमुख मान्यवरांचा परिचय व सुत्रसंचालन कवयित्री छाया पवार – पाटील यांनी केले. कवी संमेलनाचे संयोजक विजय लुल्हे यांनी आभार प्रदर्शन केले. संयोजनात्मक तांत्रिक सहकार्य सुनिल दाभाडे व गायक मनोज भालेराव यांनी सांभाळले.
कार्यक्रमाची संकल्पना निवृत्त डायट प्राचार्य नीळकंठ गायकवाड, निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जळगाव उपाध्यक्ष अशोक कौतिक कोळी, कोषाध्यक्ष युवराज माळी यांनी दिली तर कवीवर्य शशिकांत हिंगोणेकर, पत्रकार शिवाजी शिंदे यांचे अमूल्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ. अरुणा उदावंत (पाचोरा), सौ. संध्या महाजन (एरंडोल), कुमुद प्रकाशनाच्या संचालिका सौ. संगिता माळी यांचे सहकार्य मिळाले.
















