जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील आधार केंद्र आठवड्याच्या सातही सुरू ठेवण्यात यावे, अशी मागणी जिल्हा सचिव अॅड. जमील देशपांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अॅड. जमील देशपांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील सर्व आधार केंद्र शनिवार व रविवार व सुटीच्या दिवशी बंद असतात. त्यामुळे नागरीकांच्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आठवड्यात पाच दिवस आधार केंद्र सुरू असतात. नविन आधार बनविणे, आधार नंबर मोबाईलला लिंक करणे, मोबाईल नंबर बदलविणे, पत्ता बदलविणे, फोटो बदलविणे, बँक खात्याला आधार जोडणे इ. अनेक कामाकरीता आधार अनिवार्य करण्यात आले आहे. आधार केंद्राच्या वेबसाईटवर आधार केंद्र हे आठवड्याच्या सातही दिवस सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत सुरू असतात अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील आधार केंद्र शनिवार व रविवार बंद असतात. बहुतेक आस्थापनांना फक्त शनिवार / रविवारी सुटी असते त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना फक्त शनिवार / रविवारीच आधार अपडेट करण्याकरीता वेळ मिळत असतो व तसे होत नसल्याने त्यांना त्यांचा रोजगार बुडवून आधार अपडेट करावा लागतो. आधार केंद्राचे संचलन ऑनलाईन असते त्याकरीता जिल्ह्यातील आधार केंद्र आठवड्याच्या सातही सुरू ठेवण्यात यावे, अशी मागणी याद्वारे करण्यात आली आहे.
















