चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बहाळ रथाचे ग्रामपंचायतीकडून कोर्टाचा त्रास टाळण्यासाठी दोन लाखाची लाच खाजगी व्यक्तीमार्फत स्वीकारणार्या बहाळ सरपंचासह तिघांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईने ग्रामपंचायत वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
धूळे एसीबीच्या पथकाने सरपंच राजेंद्र महादू मोरे, ग्रामपंचात शिपाई शांताराम तुकाराम बोरसे व खाजगी इसम सुरेश सोनू ठेंगे अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार यांची मौजे बहाळ रथाचे येथे गट शेत जमीन आहे. या शेतजमिनीवर ग्रामपंचायत बहाळ हे त्यांचा हक्क दाखवून सदरची जागा परस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता असल्याने तक्रारदार यांनी ग्रामपंचायती विरुद्ध न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला. त्यानंतर सरपंच राजेंद्र मोरे यांनी तक्रारदार यांना भेटून त्यांच्या शेतजमिनीबाबत ग्रामपंचायतीकडून कोर्ट कचेर्यांचा त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात दहा लाख रुपये लाच मागितली व त्यात पाच लाखांवर तडजोड होवून एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. लाचेतील पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपये खाजगी व्यक्ती सुरेश टेंगे याने आरोपी सरपंचांच्या घरात स्वीकारताच सुरूवातीला त्याला व नंतर सरपंच व शिपाई शांताराम बोरसे यांना ताब्यात घेण्यात आले.