अहमदनगर (वृत्तसंस्था) बांधकाम परवानगीसाठी ८ लाख रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी मनपाचे आयुक्त पंकज जावळे व त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत. जावळे व देशपांडे या दोघांविरुद्ध येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनपाच्या आवारात फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
तक्रारदार हे त्यांच्या भागीदारासह बांधकाम व्यवसाय करत आहेत. मनपा हद्दीतील मौजे नालेगाव येथे २२६०.२२ चौरस मीटर प्लॉट त्यांनी खरेदी केला आहे. या प्लॉटवर तक्रारदार आणि त्यांच्या भागीदारास बांधकाम करायचे म्हणून त्यांनी बांधकाम परवानगीसाठी मनपा कार्यालयाकडे अर्ज केला. १८ मार्च २०२४ रोजी ऑनलाइनद्वारे तक्रारदाराने हा अर्ज केला होता. बांधकाम परवानगीसाठी मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी त्यांचे स्विय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्यामार्फत ९ लाख ३० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही मागणी तक्रारदारास अमान्य झाल्याने त्यांनी जालना विभागाच्या अँटी करप्शन विभागाकडे १९ जून २०२४ रोजी तक्रार केली. तद्नंतर अँटी करप्शन विभागाने १९ व २० जून २०२४ रोजी लाच मागणीची पडताळणी केली. पडताळणीअंती स्विय सहाय्यक देशपांडे याने मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्याकडून बांधकाम मिळवून देण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी पंचासमक्ष केली.
या दरम्यान मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे हे त्यांचे स्विय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे निष्पन्न झाले. तद्नंतर जालन्याच्या अँटी करप्शन विभागाच्या पथकाने २७ जून २०२४ रोजी महानगरपालिकेत येऊन कारवाई केली. जालना अँटी करप्शन विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे, पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर, पोलीस अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमदडे, गणेश चेके, गणेश भुजाडे, शिवलिंग खुळे, अतिष तिडके, गजानन खरात, विठ्ठल कापसे व भालचंद्र बिनोरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.