धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील उड्डाण पुलावरील पडलेली वाळू आणि मुरूम तात्काळ साफ करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा भाजपने आज सकाळी दिला होता. यावर तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी तात्काळ पावलं उचलत साफसफाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार काही कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेली वाळू ट्रॅक्टरमध्ये भरून नेली. दरम्यान, रात्रीतून अवैध वाळू वाहतूक कोणी केली?, त्यांच्यावर कारवाई होणार का? या प्रश्नांचे उत्तर मात्र, अद्याप मिळालेले नाही.
भाजपने सोशल मीडियात टाकलेल्या संदेशात म्हटले होते की, अनेक दिवसापासून वाळू चोरी विषयीच्या तक्रारी तालुक्यातून वाढल्या आहेत. धरणगाव-एरंडोल, धरणगाव-जळगाव,धरणगाव-चोपडा या रस्त्यावर बेकायदेशीर वाळू व मुरुमाची वाहतूक रात्रीतून होते, हे माहित असूनही महसूल विभागाकडून याकडे जाणून बुजून नेहमीच ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले जाते. शहरातील मुख्य रस्त्यांवर रेतीचा व मुरूम खच पडलेला असतो. त्यामुळे निष्पाप सायकल व दुचाकीस्वार यांच्या गाड्या स्लिप होऊन छोटे मोठे अपघात घडत असतात. त्यामुळे तहसीलदार नितीनकुमार देवरे व प्रांताधिकारी गोसावी साहेबांना ही बेकायदेशीर वाळू व मुरूम वाहतूक थांबवावी. तसेच उड्डाण पुलावरील पडलेली वाळू तात्काळ रस्त्यावरून साफ करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील व शहराध्यक्ष दिलीप महाजन यांनी दिला होता. यावर तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी नितीनकुमार देवरे यांनी तात्काळ पावलं उचलत साफसफाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार काही कर्मचाऱ्यांनी साफ सफाई केली. मात्र, रात्रीतून अवैध वाळू वाहतूक कोणी केली?, त्यांच्यावर काय कारवाई केली?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
















