जळगाव (प्रतिनिधी) गणपती विसर्जनानंतर माझा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते, मात्र माझ्या दृष्टीने आता भाजप प्रवेश हा गणपती बाप्पाबरोबर विसर्जित झाला आहे, असे म्हणत आमदार एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जामनेर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमात जात असताना आ. एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपती विसर्जनानंतर एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे म्हणाले होते. त्यावर खडसेंनी शनिवारी माझा भाजपमध्ये होणारा प्रवेश गणपती बाप्पासोबतच विसर्जित झाला असल्याचा पलटवार केला आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी सदस्य आहे आणि यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय काम करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार आहे. अनेक वेळा जामनेर तालुक्यात माझ्या सभा झालेल्या असून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.