अमळनेर (प्रतिनिधी) पढावद येथील ६ मजुरांसह बैलगाडी पांझरा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात उलटली. मात्र, पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या सर्वांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.
शिंदखेडा तालुक्यातील पढावद येथील शेतकऱ्यांची ७५ टक्के जमीन अमळनेर तालुक्यातील तांदळी शिवारात आहे. त्यामुळे पढावद येथील शेतकरी आपल्या शेतीची कामे करण्यासाठी रोज पांझरा नदीत जीव धोक्यात घालून ये-जा करतात. दरम्यान, पांझरा नदीत पढावद येथे पूल नसल्यामुळे ३ ऑक्टोंबर पढावदचे प्रगतशील शेतकरी व सरपंच रवींद्र पवार यांची बैलगाडी ६ मजूरांना घेऊन नदीच्या प्रवाहातून शेतात कामासाठी जात होती. अचानक नदीचा प्रवाह वाढल्यामुळे व पाण्याच्या अंदाज न आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात ही बैलगाडी उलटली. नदीतील जास्त पाण्यामळे बैलगाडी व शेतमजर वाह लागले.
यावेळी मजुरांनी आरडाओरडा केल्यामुळे तसेच ग्रामस्थांसमोरच बैलगाडी पाण्यात वाहून जात असल्याने लगेचच सर्व ग्रामस्थ त्यांच्या मदतीसाठी धावले. पढावद येथील पोलीस पाटील ईश्वर पवार व ग्रामस्थांनी मजूर तसेच शेतमालकाची बैलगाडी काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. बऱ्याच वेळानंतर बैलगाडी व मजूर सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आले. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. पढावद येथील पोलीस पाटील ईश्वर पवार यांना पोहता येत नसताना त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष भूषण बोरसे, राजेंद्र पाटील, नारायण गिरासे, दीपक माळी, महेंद्र पाटील, युवराज माळी, शिवाजी पाटील, मनोहर पाटील, चरणसिंग गिरासे, भैया नगराळे आदींनी त्यांचे कौतुक केले आहे.