मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात शाह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूर या चार विभागांतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यांना मार्गदर्शन करतील.
मेळाव्याला प्रत्येक विभागातून ७०० ते ८०० प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. भाजपचे प्रमुख नेते, आजी-माजी आमदार-खासदार, सर्व आजी-माजी जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी या मेळाव्याला हजर राहतील. पक्षसंघटनेत चैतन्य आणण्यासाठी हे विभागीय मेळावे होत असून, यानिमित्ताने शाह विधानसभेचा बिगुल फूंकतील. महाराष्ट्र विधानसभेसाठी १० ऑक्टोबरच्या आसपास आचारसंहिता लागू होईल, असे प्रशासनाच्या वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडे जेमतेम १५ दिवस राहिले आहेत. भाजप विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांचे दौरे महाराष्ट्रात वाढले आहेत.
शाहदेखील मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस राज्यातील मुंबई व कोकण वगळता इतर चार प्रमुख विभागात जाऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी मंगळवारी सकाळी ९ वाजता ते नागपूरमध्ये दाखल होतील. येथे विदर्भातील सर्व १० जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांना शाह मार्गदर्शन करतील. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता संभाजीनगरमध्ये मराठवाड्याच्या ८ जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. बुधवारी सकाळी शाह नाशिककडे रवाना होतील. येथे नगरसह उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांशी हितगुज करतील. कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित करतील.