औरंगाबाद (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद येथे पोहोचलेले राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Raj Thackeray Son Amit Thackeray) यांनी अटी-शर्थींवरून थेट पोलीस प्रशासनालाच आव्हान दिलं आहे. १ मे रोजी होणारी सभा भव्य-दिव्य असेल आणि आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार आहोत, असं अमित ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घालून दिलेली आवाजाची मर्यादा पाळणं शक्य होईल का? असा प्रश्न अमित ठाकरे यांना पत्रकारांकडून विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, १ मे रोजी होणारी सभा भव्य-दिव्य असेल आणि आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार आहोत.
औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानातून राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या सभेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभेच्या नियोजनात कोणतीही काटकसर राहू नये, यासाठी स्वत: अमित ठाकरे हे आढावा घेण्यासाठी सभास्थळी पोहोचले. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या तयारीवर मी खूश आहे, असं यावेळी अमित ठाकरे म्हणाले.