औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका २५ वर्षीय डॉक्टरने जवळीक वाढवून नर्ससोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणी गरोदर राहिली असता गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. धक्कादायक म्हणजे डॉक्टरच्या मावस भावानेही तिच्यासोबत जबरदस्ती केली, तर दोघा मित्रांनी विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त निखील गुप्ता, डीसीपी अपर्णा गीते आणि एसीपी (क्राईम) धुमे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक सोमवारी पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी सिडको बसस्थानक येथील सुरक्षारक्षकाचा फोन आला. त्याने सांगितले की, बस स्थानकात अंदाजे २५ वर्षीय तरुणी तिथे आलेली असून तिला दामिनी पथकाच्या मदतीची गरज आहे.
पोलीस अधिकारी सिडको बस स्थानक परिसरात जाऊन पीडितेला भेटले, तेव्हा ती अतिशय अस्वस्थ आणि घाबरलेल्या अवस्थेत आढळली. मुलीला आधार देत पोलिसांनी विश्वासात घेऊन तिच्यासोबत काय झाले याबाबत जाणून घेतले. तिने सांगितले की, गारखेडा परिसरातील एका नामांकित रुग्णालयात ती नर्स म्हणून मागील तीन महिन्यांपासून कार्यरत आहे. याच रुग्णालयात RMO म्हणून कार्यरत असलेल्या एका २५ वर्षीय डॉक्टरने तिच्यासोबत जवळीक वाढवून जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
गर्भपाताच्या गोळ्या देऊन पुन्हा अत्याचार
तरुणी गरोदर राहिली असता गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. मुलीला रक्तस्त्राव होऊन तीव्र वेदना होत असल्यामुळे ती डॉक्टरकडे गेली असता, त्याने परत तिला मुकुंदवाडी पोलीस हद्दीत जालना रोडवर असलेल्या नातेवाईकाच्या हॉटेलमध्ये नेऊन त्या परिस्थितीतही तिच्याशी शारीरिक संबंध जबरदस्तीने ठेवले आणि निघून गेला. त्यानंतर त्याच्या मावस भावाने देखील तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती त्याच्या तावडीतून कशी बशी सुटून आली. डॉक्टरच्या इतर दोन मित्रांनी देखील तिचा विनयभंग केल्याचे तिने सांगितले.
हे प्रकरण मुकुंदवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुलीला मुकुंदवाडी पोलीस स्टेशन येथे हजर केले. तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन मुकुंदवाडी येथे डॉक्टर आणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.