जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव लोकसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे. खा. स्मिता वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने गिरणा नदीवरील बांभोरी येथे नवीन पुलाच्या उभारणीसाठी ७९ कोटी २३ लाख ३९ हजार ६४८ रुपये इतका निधी मंजूर केला आहे. हा पूल नॅशनल हायवेवरील महत्त्वाचा भाग असून, वाढत्या वाहतुकीच्या ओझ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधला जाणार आहे.
या नवीन पुलामुळे जळगाव शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. स्मिताताई वाघ यांनी सांगितले की, “जळगावचा सर्वांगीण विकास हा आमचा प्राधान्यक्रम आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने हा पूल उभारणे हे मतदारसंघासाठी एक मैलाचा दगड ठरेल. पारदर्शक प्रक्रिया आणि दर्जेदार कामाच्या माध्यमातून आम्ही जळगावला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेऊ. या प्रकल्पासोबतच गिरणा नदीवरील विद्यमान जुन्या पुलाची विशेष दुरुस्ती व मजबुतीकरण, तसेच कालिंका माता ते खोटे नगर रस्त्याचे व्हाईट टॉपिंग पद्धतीने काँक्रिटीकरण आणि आरसीसी गटार बांधकाम अशा इतर प्रमुख विकासकामांनाही गती मिळणार आहे. या सर्व कामांमुळे जळगावकरांना सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी प्रवास उपलब्ध होईल. शहरातील दैनंदिन वाहतूक व्यवस्था सुधारून आर्थिक प्रगतीला नवीन चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.
















