जळगाव (प्रतिनिधी) बारमध्ये दगडफेक करीत तेथील गल्ल्यातून ५ लाख ७० हजारांची रोकड जबरीने लुटून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. तर रोकड घेवून पसार झालेले दोघे पोलिसांना गुंगारा देत होते. गुंगारा देणाऱ्या सचिन अभयसिंह चव्हाण (वय २६, रा. शंकर आप्पानगर, पिंप्राळा) व अक्षय नारायण राठोड (वय २२, रा. यश नगर, पिंप्राळा) या दोघांच्या एलसीबीच्या पथकाने धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून मुसक्या आवळल्या.
गुजराल पेट्रोल पंपाशेजारील शंकर प्लाझामध्ये एन. एन. वाईन अॅण्ड बार असून त्याठिकाणी अमोल संतोष कोळी हा तरुण मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. रविवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास सचिन चव्हाण, राकेश जाधव, भोला उर्फ सुगर भोई, अक्षय उर्फ गंप्या राठोड हे त्याठिकाणी आले. त्यांनी पाच बियरची मागणी केली. परंतु मॅनेजरने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली असता, त्यांच्याकडून शिवीगाळ करण्यात आली. तसेच मी कोण आहे ? आत्ताच एमपीडीएमधून सुटून आलो आहे, असे म्हणत ते बारमध्ये शिरले. त्यांनी ग्राहकाच्या हातातील बियरची बाटली ग्राहकाच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, यातील संशयित भोला उर्फ सुगर भोई, राकेश मिलींद जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली होती तर उर्वरीत दोघे फरार झाले होते.
लुटलेल्या पैशांवर करीत होते मौजमस्ती !
रोकड घेवून सचिन चव्हाण व अक्षय राठोड हे दोघे अमळनेर मार्गे धुळे त्यानंतर नाशिक, पुणे व मुंबई याठिकाणी पसार झाले होते. त्यांनी लुटलेले पैसे मौजमस्तीमध्ये उडविले. त्यानंतर ते पाळधी येथील साईबाबा मंदिरात आल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघंच्या मुसक्या आवळल्या त्यांच्याकडून ६८ हजारांची रोकड जप्त करण्यात आली.
या पथकाची कारवाई !
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, दीपक माळी, रविंद्र पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील यांच्या पथकाने केली.